मुंबई- राज्यातील सत्ता स्थापनेचा गुंता लवकरच सुटण्याची चिन्हे आहेत. महायुती सत्ता स्थापन करण्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या मागे संपूर्ण भाजप खंबीरपणे उभी असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन होणार, असा दावा त्यांनी केला. शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. सेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे खुली आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज मुख्यमंत्र्यांचे निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे मुख्यमंत्री होतील, याचा पुनरुच्चार केला.