मुंबई - कोरोना संकट हाताळण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. खासदार राहुल गांधी यांनी वर्षभरापूर्वीच कोरोनाच्या त्सुनामी संकटाचा इशारा दिला होता. परंतु, मोदींपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत भाजप नेत्यांनी गांभीर्याने घेतले नाही. परिणामी, देशात मृतांची संख्या लाखांच्या घरात आहे. केंद्रातील भाजप सरकारचा अहंकार आणि गलथानपणा याला सर्वस्वी जबाबदार आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोनिया गांधी यांना पत्रव्यवहार करण्यापेक्षा देशाला स्मशानभूमी करणाऱ्या मोदींना पत्र लिहिण्याचे धाडस दाखवावे, असे खडे बोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुनावले. तसेच, मोदींच्या पापावर पांघरून घालण्याचा प्रयत्न फडणवीस यांच्याकडून सुरू असल्याचे ते म्हणाले.
मोदींच्या कारभारामुळेच नाचक्की
कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती असून मोदी सरकारने यासंदर्भातील सर्व अधिकार केंद्राकडे घेऊन राज्यांना रामभरोसे सोडले. मोदींकडे ठोस धोरण नाही, आता परिस्थिती हाताबाहेर गेल्याने भाजप नेते सैरभेर झाले आहेत. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघात मृतदेह जाळण्यासाठी जागा नाही, हे विदारक दृश्य जगभरातील माध्यमे दाखवत आहेत. ७० वर्षांत कधी भारताची झाली नव्हती एवढी नाचक्की मोदींच्या मनमानी कारभारामुळेच झाल्याचे पटोले यांनी सांगत फडणवीस यांचा खरपूस समाचार घेतला.
केंद्राकडून आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे
मोदी सरकारने राज्यांना भरभरून रेमडेसिवीर, ऑक्सिजन व वैद्यकीय मदत पुरवली, असे म्हणणारे देवेंद्र फडणवीस खोटारडे आहेत. यावर सर्वोच्च न्यायालय आणि देशातील अनेक उच्च न्यायालयांनी शिक्कामोर्तब केले आहे. ऑक्सिजन पुरवठ्याबाबत टास्क फोर्स नेमून सर्वोच्च न्यायालयाने मोदींच्या अकार्यक्षमतेवर शिक्कामोर्तबच केले आहे. पीएम केअरमधून ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या फक्त घोषणा केल्या, प्रत्यक्षात केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रात एकही ऑक्सिजन प्लांट उभारला नाही. महाराष्ट्राची रोजची ऑक्सिजनची गरज १ हजार ७५० मे. टन आहे. यातील १ हजार २०० मे. टन महाराष्ट्रात निर्माण केला जातो. यात मोदी सरकारचे काही योगदान नाही. ५५० मे. टन अधिकचा ऑक्सिजन हवा होता तेही मोदी सरकार पुरवू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे, असे पटोले म्हणाले.
हेही वाचा -ना मोदी ना पवार, थेट सोनिया गांधींना देवेंद्र फडणवीसांचे पत्र
देशातील जनता रेमडेसिवीर मागत असताना भाजपचे नेते रेमडेसिवीरचा काळाबाजार करण्यात व्यस्त होते. स्वतः देवेंद्र फडणवीसही एका काळाबाजार करणाऱ्या कंपनीच्या लोकांना वाचविण्यासाठी मध्यरात्री पोलीस स्टेशनला जाऊन गोंधळ घालत होते. रेमडेसिवीर साठेबाजीप्रकरणी अहमदनगरच्या भाजप खासदाराविरोधात कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यालालयाने दिले आहेत. पीएम केअर फंडातून दिलेल्या व्हेंटिलेटरमध्येही घोटाळा असून, अनेक व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याने वापराविना धुळखात पडून आहेत, असे पटोले म्हणाले.
इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्र सरकारची आकडेवारी पारदर्शक
महाराष्ट्र सरकार पारदर्शकपणे आकडेवारी देत आहे. उत्तर प्रदेश, गुजरात, मध्य प्रदेश, बिहारमध्ये किती कोरोना चाचण्या होतात? किती रुग्णांना ऑक्सिजन मिळतो? कोरोनाने भाजपशासित राज्यात किती मृत्यू होत आहेत? याची माहिती फडणवीसांनी भाजप अध्यक्षांना पत्र लिहून मागवावी. गुजरातमध्ये ७१ दिवसांत १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू झाले असताना सरकार फक्त ४ हजार २१८ मृत्यू दाखवत असल्याचा आरोप करत, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहारमध्ये कोरोना मृत्यू लपवण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने निर्दयीपणे मृतदेह पुरले जात आहेत, तर हजारो मृतदेह गंगा नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत, हे विदारक चित्र जग उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे पटोले यांनी सांगितले.