मुंबई: संभाजी भिडे यांच्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या मागणीनंतर सभागृहात निवेदन केले. यावेळी त्यांनी संभाजी भिडे यांच्या पुस्तकातील काही उतारे आणि त्यांचे एक भाषण व्हायरल होत असल्याचे सांगितले. त्या भाषणात त्यांनी ज्योतिबा फुले आणि महात्मा गांधी यांची बदनामी केल्याचे दिसून येत आहे. मात्र हे भाषण अमरावती जिल्ह्यातील केलेल्या सभेतील नाही ते अन्य ठिकाणचे आहे. त्याबाबतचे आवाजाचे नमुने पोलीस तपासत असल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली.
संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल: संभाजी भिडे यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल त्यांच्यावर अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार त्यांची चौकशी करून त्यांची वक्तव्ये तपासली जात आहेत. तसेच आवाजाचे नमुने तपासले जात आहेत. त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, संभाजी भिडे हे धर्मासाठी कार्य करतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी कार्य करतात.बहुजनांना शिवरायांचा इतिहास समजावा म्हणून कार्य करतात. त्यासंदर्भात त्यांचे कार्य चांगले असल्याचा दाखला फडणवीस यांनी दिला. मात्र जर त्यांनी आक्षपार्ह वक्तव्य केले असेल तर कारवाई केली जाईल, असेही फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केले.