मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारचा अर्थसंकल्प आज सादर अधिवेशनात सादर करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारने यावेळी करावरील देखील सूटविषयी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
महिला व दिव्यांगांसाठी महत्वाची घोषणा : अर्थसंकल्पातून राज्यातील महिलांना दिलासा मिळाला आहे. महिलांना आता मासिक 25,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न व्यवसाय करमुक्त करण्यात आले आहेत. यापूर्वी ही मर्यादा मासिक 10,000 रुपये होती, ती आता 25,000 रुपये इतकी करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगांसाठी देखील राज्य सरकारने कराविषयी महत्वाचा निर्णय घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींच्या व्याख्याबदलामुळे असंख्य दिव्यांगांची व्यवसायकरातून सुटका करण्यात आल्याचे राज्य सरकारने अर्थसंकल्पात नमूद केले आहे.
हवाई विकासाला चालना :हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला आहे. राज्य सरकारने याकरिता एटीएफ मूल्यवर्धित कर (व्हॅट) 18 टक्के इतका निर्धारित केला आहे. अर्थकारणाला चालना देण्यासोबतच हवाई वाहतुकीला प्रोत्साहन आणि आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले.