मुंबई-विरोधकांचा लोकशाहीच्या मंदिरावर विश्वास नाही. नवी संसद ही देशाची ताकद आहे. त्यामुळे देशाची प्रतिमा उंचावणार आहे. लोकशाहीत कावीळ झाल्यासारखे वागणे अयोग्य आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. इंदिरा गांधींनी संसदेचे केलेले उद्घाटन लोकशाहीविरोधी नव्हते का, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की कृषी कर्जात सिबिल अट लागू होत नाही. शेतकऱ्यांना कर्ज नाही दिल्यास एफआयआर दाखल करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी 12 तास वीज देण्यासाठी सोलर योजना लागू केल्याचे त्यांनी सांगितले. मोदी सरकारने सेंट्रल व्हिस्टा येथील नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनाची तयारी सुरू केली आहे. मात्र, या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यात न आल्याने विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.
यापूर्वीदेखील देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिला होता इशारा-शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देताना कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना सिबिलची अट घालू नये, असे आदेश उपमुख्यमंत्री यांनी नुकतेच अमरावतीमध्ये दिले होते. कोणत्याही बँकेने पिक कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिलचे कारण त्रास देऊ नये, असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. अमरावती जिल्ह्यातील काही बँकांनी अनुदानाचे पैसे हे कर्ज खात्यात टाकल्याची सरकारने गंभीर घेतली आहे. अनुदानाचे कुठलेही पैसे शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात टाकू नये. याचे पालन न करणाऱ्या बँकांना नोटीस दिल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.