मुंबई - एक वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या शिंदे- फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आमदार अजित पवार आपल्या समर्थकांसह सामील झाले व युतीची महायुती झाली. परंतु, या महायुतीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांची उचलबांगडी होणार असून, अजित पवार हे मुख्यमंत्री होतील, या चर्चांना उधाण आले. यावर सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुलस्टॉप लावला. महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच राहतील, ते बदलले जाणार नाहीत, असे ठामपणे सांगितले. तरीसुद्धा १६ अपात्र आमदारांच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेसुद्धा अपात्र ठरतील व राज्यातील मुख्यमंत्री बदलले जातील, असा ठाम विश्वास विरोधकांना आहे.
एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे अजित पवार हे मुख्यमंत्री होणार या केवळ अफवा आहेत. सत्तेत येण्यापूर्वीच अजित पवार यांना सर्व गोष्टींची कल्पना दिलेली आहे - देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
अजित पवार होणार मुख्यमंत्री? - राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार यांच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील समावेशाने राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलून गेली आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात दिवसेंदिवस नवीन उलाढाली होताना दिसत आहेत. एकवेळ मी लग्न करायचा राहीन, परंतु अजित पवार यांच्याबरोबर जाणार नाही, असे काही वर्षांपूर्वी ठामपणे सांगणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांचे सत्तेत आल्यावर स्वागत केले.
लवकरच शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणारच याचा ठाम विश्वास आहे - अनिल परब, आमदार, ठाकरे गट
16 आमदार अपात्र होतीलच -शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करत २०१९ ला अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले. पण हे सरकार जेमतेम ८० तास टिकले. त्यानंतर सतत राज्याच्या राजकारणात ज्या काही राजकीय उलाढाली होत आहेत त्या सर्वांनाच परिचयाच्या आहेत. अशातच एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत ४० आमदारांच्या समर्थकांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आला आहे. या कारणास्तव आता अध्यक्षांना हा निर्णय घ्यावाच लागणार असून हे आमदार अपात्र ठरतील, असा ठाम विश्वास ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.