मुंबई :राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये जनतेसमोर विविध प्रश्नांसाठी जाताना आता शरद पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांचा दौरा करुन आठ दिवसानंतर संपूर्ण राज्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच जनतेत जाऊन शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाची यावर काय प्रतिक्रिया असे विचारता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार हे एकटे फिरणार असतील, पण आता यापुढे आम्ही तिघे मिळून राज्याचा दौरा करणार आहोत. त्यामुळे आगामी सर्व निवडणुका आम्ही सोबतच लढवणार असा निर्धारदेखील फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवल्या जातील असेही फडणवीस यांनी बोलताना सांगितले.
पंकजा मुंडे पक्षातच :भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय महासचिव पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने येत आहेत. पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये सहभागी होणार अशी चर्चा राज्यभरात सुरू आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे या आमच्या राष्ट्रीय सचिव आहेत. त्यांचे पक्षातील असलेले योगदान पाहता त्या कुठेही पक्ष सोडून जाणार नाहीत, याची आम्हाला खात्री आहे. मात्र, जर त्या पक्षात काही कारणाने नाराज असतील, तर त्यांच्याशी आमचे केंद्रीय नेतृत्व चर्चा करेल. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. मात्र, त्या पक्ष सोडून कोठोही जाणार नाही असा दावा देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.