मुंबई Devendra Fadnavis Ganesha Pranapratishtapana : आज सर्वत्र गणेश चतुर्थीनिमित्त गणेशोत्सवाची सुरुवात झालीय. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलीय. याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच नवीन संसद भवनाविषयी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या संपूर्ण टीमला, खासदारांना शुभेच्छा दिल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच पवार कुटुंबियांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनाही त्यांच्या वक्तव्याबाबत फटकारलं आहे. मुंबईत आपल्या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
विघ्न दूर करण्याची शक्ती द्यावी :याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी महाराष्ट्रातील, देशातील आणि विश्वातील सर्व गणेश भक्तांना या गणेशपर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे. आपण कुठल्याही कामाची सुरुवात श्री गणेशाच्या पूजेनं करतो. कारण श्री गणेशाचं वंदन केल्यानं आपल्यासमोरील विघ्न दूर होतात. म्हणून आजच्या दिवशी मी श्री गपती बाप्पाला एवढीच प्रार्थना करतो की, आज आपल्यासमोर, देशासमोर जी काही विघ्न आहेत, ती दूर करण्याची शक्ती आपणास त्यानं द्यावी. आपल्या राज्यातील जे काही घटक आहेत त्यात शेतकरी, कामगार असतील त्या सर्वांना या गणेशाचे आशीर्वाद लाभावेत. त्यांच्या समोरील विघ्न दूर व्हावीत, अशी मी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो.
महिला विधेयक अतिशय आनंदाची बाब :देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, संसदेमध्ये महिला विधेयक सादर होतंय. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या विधेयकाविषयी फार उत्कंठा आहे. तसंच देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं देशाला नवीन संसद भवन मिळालंय. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आजच्या या गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर नवीन संसद भवनामध्ये सर्व खासदारांनी प्रवेश केलाय. तिथं आपलं अधिवेशन सुरू झालंय. मला असं वाटतं की, आपल्या भारतीय संस्कृतीला अनुरूप अशा पद्धतीचं कार्य आज झालंय. त्यामुळं मी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ व सर्व पक्षांचे सर्व खासदार या सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ही एक न्यायिक प्रक्रिया आहे. पण त्यासंदर्भामध्ये फक्त विधानसभा अध्यक्ष बोलू शकतात. पण इतकं नक्की आहे की, श्री गणेशाचा आशीर्वाद हा महायुतीच्या पाठीशी आहे.