मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत राऊत यांनी बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा द्यावा, असे वक्तव्य केले होते. राज्यभर याविरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राऊतांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.
मुघलांचे वंशजही शिवरायांच्या वंशजांविरोधात 'असे' बोलले नसते - फडणवीस
राऊतांनी सत्तेच्या अहंकारातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांविरोधात वक्तव्य केले आहे. त्यांनी छत्रपतींच्या घराण्याची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हेही वाचा - युवा आमदारांशी संवाद: 'महाराष्ट्राला गरज असताना सगळी नाती एकत्र'
छत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. शिवरायांच्या वंशजांबद्दल संजय राऊतांनी ज्या प्रकारचे वक्तव्य केले आहे, त्याचा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश निषेध करतो आहे. आज मुघलांचे वंशज जिवंत असतील, तर ते देखील महारांजांच्या वंशजांबद्दल अशाप्रकारे बोलले नसते. राऊतांनी सत्तेच्या अहंकारातून हे वक्तव्य केले आहे. त्यांनी छत्रपतींच्या घराण्याची जाहीर माफी मागितली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील जनता त्यांना कधी माफ करू शकणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.