मुंबई: अशी लोक सावरकरांबद्दल बोलत आहेत, हे दुर्भाग्य आहे. तसेच त्यांना शिव्या शाप देत आहेत. त्यांना सांगावं लागतं तुम्ही सावरकर नाही, देशभक्तीवर पोसलेले राजकारणी आहात. तुमची कुठलीही ओळख नाही. राहुल गांधी म्हणाले आहेत की, मी माफी मागायला सावरकर नाही, अरे सावरकर होण्याची योग्यता काँग्रेसमध्ये नाही. त्यासाठी त्याग लागतो, तप लागतो. सावरकर होण्यासाठी मातृभूमीसाठी यातना भोगाव्या लागतात. अंदमान कोठडीत ११ वर्ष संडास जेवढी जागा असते त्यापेक्षा कमी जागेत राहावे लागते. तेव्हा खऱ्या अर्थाने सावरकर होता येते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस विशेष करून राहुल गांधी यांना लगावला आहे.
स्वातंत्र्याची ज्योत तयार केली: पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुम्ही गांधीही नाही व सावरकर सुद्धा नाही. बंगालच्या एका खासदाराने सावरकरांच्या स्मरणार्थ प्रस्ताव आणला होता. ते तुमचे आजोबा फिरोज गांधी होते. हे तुम्ही विसरलात का? इतिहासाशी तुमचा संबंध नाही. तुम्ही सावरकर कधीच होऊ शकत नाही व गांधीही होऊ शकत नाही. सावरकरांनी कोवळ्या वयात स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू केली. छोट्या छोट्या तरुणांना एकत्र करून स्वातंत्र्याची ज्योत तयार केली. हे व्रत शेवटपर्यंत त्यांनी पाळले. सावरकरांनी लंडन हाऊस मध्ये स्वातंत्र्याची ज्योत तयार केली. इंडिया हाऊस मध्ये राहत असताना बॉम्ब कसा बनवायचा, पिस्तूल कसं हातालायचं हे काम त्यांनी केलं. सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकांनी युवकांच्या मनात स्वातंत्र्याची क्रांती निर्माण केली. भगतसिंग यांनी त्याची दुसरी आवृत्ती छापली नेताजी सुभाष चंद्र बोस सांगायचे सावरकरांचे पुस्तक वाचा. इंग्रजांनी सर्वात जास्त पैसा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मागे खर्च केला, हे काँग्रेस विसरले आहे. मातृभूमीची आराधना त्यांनी केली. स्वातंत्र्य सैनिकांना स्फुरण त्यांनी दिले.