मुंबई :येत्या काही महिन्यात मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सुद्धा निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. मुंबई महानगरपालिका काबीज करणे हे भाजपचे प्रमुख लक्ष आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुरू केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देवेंद्र फडवणीस यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी मुंबईतील सर्व आमदार, खासदारांची महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे सुद्धा उपस्थित होते. जागा वाटपाचा तिढा सध्या युतीमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. त्याची सुरुवात मुंबई महानगरपालिका निवडणुकीपासून होणार आहे. त्या दृष्टिकोनातून सध्याची परिस्थिती व शिंदे गटाकडून मुंबई महानगरपालिकेसाठी केली जाणारी जागांची मागणी याबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
मनसेची साथ व जागावाटप :मुंबई महानगरपालिका निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असलेली भाजप या निवडणुकीसाठी मनसेला सुद्धा सोबत घेण्याच्या तयारीत आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा या बैठकीत आढावा घेण्यात आला. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रात्री राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. मनसे सोबत आल्यास जागा वाटपा संदर्भामध्ये सुद्धा समीकरणे कशी राहतील? याबाबत सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणे जिंकून येईल त्यालाच जागा, हे सूत्र जरी ठरले असले तरीसुद्धा भाजपला जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात कशा पाडून घेता येतील? याबाबतही मंथन झाले आहे.