मुंबई- पार्थ पवारांनी केलेल्या मागणीला कवडीचीही किंमत देत नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केले होते. यावर आजोबा आणि नातू यांनी कसे वागायचे हा त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यामुळे यावर आज मी बोलणे योग्य नाही. पण पवारांनी सुशांत प्रकरणी सीबीआय चौकशीला हरकत नसल्याचे म्हटले आहे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयला देण्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघालं असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय महत्त्वाचं वक्तव्य केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनीही सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. ते इमॅच्युअर आहेत. माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. या प्रकरणाचा तपास "सीबीआयकडे देण्यास हरकत नाही, असे ही पवार म्हणाले आहेत.