मुंबई : राज्य सरकारचा 2023-24 या वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने नमो शेतकरी महा सन्मान योजनेची घोषणा केली आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना 6000 रूपये इतका वार्षिक निधी मिळणार आहे. राज्य सरकारतर्फे ६ हजार ९०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नमो शेतकरी महासन्मान : गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या समस्येंवरून राज्य सरकारला विरोधकांनी धारेवर धरले होते. राज्यात कांद्याचे भाव घसरल्याने आणि अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे लक्ष राज्याच्या अर्थसंकल्पाकडे लागले होते. दरम्यान, आज राज्य सरकाने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही घोषणा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाकाठी एकूण 12 हजार रूपये मिळणार आहेत.
जलयुक्त शिवार : महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आलेले जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 5000 गावांमध्ये जलयुक्त शिवार 2.0 सुरू केली जाणार आहे.