मुंबई- नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी 6 मंत्र्यांना पदावरून पायउतार केले आहे. या मंत्र्यांची कामगिरी चांगली नसल्यानेच त्यांना नारळ दिला असल्याचे चर्चिले जात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याबाबत अतिशय सावध भूमिका घेत वक्तव्य केले आहे. त्यांनी नव्या चेहऱ्यांना चांगले काम करण्याची संधी मिळावी, यासाठी नवीन लोकांना संधी दिल्याचे वक्तव्य केले आहे. त्याबरोबरच त्यांनी याचा अर्थ जुन्या मंत्र्यांनी चांगले काम केले नाही, असेही म्हटले आहे.
- मंत्र्यांना डच्चू देण्याला कारणीभूत स्थिती -
प्रकाश मेहता
मेहता यांच्याकडे असलेल्या गृहनिर्माण खात्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणात प्रकाश मेहता यांची भूमिका संशयास्पद होती. एमपी मिल कंपाऊंड एसआरए प्रकरणात अपरोक्ष फाईलवर मुख्यमंत्र्यांना अवगत केले आहे. त्यामुळे हा शेरा प्रकाश मेहतांसाठी कारणीभूत ठरला. तसेच लोकयुक्तांच्या चौकशीतही मेहता यांचा कारभार पारदर्शक नसल्याचे निदर्शनाला आले आहे.
राजकुमार बडोले
सामाजिक न्याय विभागाचा कारभार करताना गेल्या वर्षी आपल्याच कन्येला परदेशी जाण्यासाठी फेलोशिप देण्याचे प्रकरण गाजले होते. त्याबरोबरच ओबीसी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक शुल्क भरण्याबाबत झालेला उशीर बडोलेंना भोवला आहे.
विष्णू सवरा
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांची पदावरून गच्छंती होणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस होती. आदिवासी वन जमिनींच्या प्रकरणात सवरा यांना प्रभावी काम करता आले नाही. तर नाशिकहून निघालेला लाँग मार्च थोपवण्यातही त्यांना अपयश आले. शिवाय आदिवासी बहुल जिल्हा पालघरचे पालकमंत्री असतानाही त्यांना प्रभावी कामगिरी करता आली नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी ओढवली.