मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींच्या कामाची प्रशंसा केली तसेच त्यांनी केलेल्या कामामुळे महाराष्ट्राला किती मोठा फायदा झाला याची माहिती दिली. राज्यात मोदींच्या सहकार्याने ४ लाख कोटींपेक्षा जास्त रकमेची विकासकामे सुरू असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
प्रचंड विकासकामे झाली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात प्रचंड विकासकामे झाली आहेत. देशभरात विकासाची गंगा पंतप्रधानपदी मोदी विराजमान झाल्यानंतर वाहत आहे. राज्याचाही त्यामुळे मोठा फायदा झाला आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मोदींच्या नेतृत्वामुळेच हे शक्य होऊ शकले आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मोदींच्या नेतृत्वात सुरू झालेल्या योजनांना एकही डाग लागलेला नाही. विकास मात्र जोमाने होत आहे.
मोदींनी राबवलेल्या योजनांचा लाभ -देशभरातील जनतेला मोदींनी राबवलेल्या सर्वच योजनांचा लाभ होत आहे. राज्यातील लोकांनाही केंद्राने राबवलेल्या योजनांचा मोठा लाभ होत आहे. तसेच कोट्यवधी लोकांचे जीवन या योजनांच्या लाभामुळे सुधारले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. देशभरात कोट्यवधी लोकांना मोदींनी राबवलेल्या योजनांचा लाभ होत असतानाच राज्यातीलही लाखोच नाही तर काही योजनांचा लाभ कोट्यवधी लोकांना झाला असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अनेक लोकोपयोगी योजना -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरू झालेल्या सर्व योजनांचा लाभ सांगताना फडणवीस म्हणाले की, १७ कोटीच्यावर महाराष्ट्रातील नागरिकांना कोरोना लसिचा डोस देण्यात आला आहे. हा मोफत डोस दिल्याचे मोदींच्या कार्यकर्तृत्वाचे एक मोठे उदाहरण असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याबरोबरच प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जलजीवन योजना, आयुष्यमान भारत योजना अशा अनेक लोकोपयोगी योजनामुळे लाभार्थींना मोठा फायदा झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
एकट्या महाराष्ट्रात पीएम उज्वला योजनेचा ३८ लाख ९० हजार महिलांना लाभ झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. पीएम किसान सन्मान योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत. त्यामुळे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा होत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. राज्यानेही या योजनेत ६ हजार रुपयांची भर घातली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात १२ हजार रुपये जमा होतात. त्याचा लाभ लाखो शेतकऱ्यांना होत आहे. पीएम पीक विमा योजनेचे ८७ लाख शेतकरी लाभार्थी असल्याचे त्यांनी सांगितले.
गरीब कल्याणाचा अजेंडा -पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात इतर योजनांच्यामध्ये कौशल विकास योजनेचा १० लाख २७ हजार लोकांना लाभ देत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. पीएम स्वनिधी योजनेचा लाखोंना लाभ होत आहे. मुद्रा योजनेचा लाभ लाखो उद्योजकांना झाला. एकट्या महाराष्ट्रात ४१ लाख लोकांना या योजनेचा लाभ झाला आहे. पीएम मातृ वंदना योजनेचा ३२ लाख मातांना महाराष्ट्रात लाभ झाला. महाराष्ट्रातील ४ कोटी लोकांना मोफत अन्न योजनेचा लाभ झाला आहे. गरीब कल्याणाचा अजेंडा मोदी सरकारने राबवला आहे. त्याचा फायदा लोकांना होत असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - 9 Years Of Modi Govt : 'तुमच्या स्नेहामुळे मला आणखी काम करण्याची ताकद मिळते', मोदींनी मानले कौतुक करणाऱ्यांचे आभार