मुंबई -कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलतेची विपूलता असून जगाच्या पाठीवर संशोधन करणाऱ्या भारतीयांपैकी अनेक जण कोकणातील आहेत. कोकणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबर नाविन्यपूर्ण संशोधनासाठी अनुकुल वातावरण व क्षमता आहे. त्यामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची सूचना खासदार शरद पवार यांनी गुरुवारी (दि. 7 जाने.) केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्य शासन कोकणच्या शाश्वत विकासासाठी बांधिल असून शरद पवार साहेबांच्या सूचनेची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वास बैठकीत दिला.
सह्याद्री अतिथीगृहात झाली बैठक
कोकण विभागास आंतरराष्ट्रीय इनोव्हेशन विभाग म्हणून विकसित करण्याबाबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आज (गुरुवार) विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ संदर्भात सादरीकरण केले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनीही इनोव्हेटीव्ह रिजनच्या संकल्पनेला पाठिंबा दर्शवत कोकणच्या व राज्याच्या विकासासाठी संकल्पनेची अंमलबजावणी आवश्यक असल्याचे सांगितले.
पुढील शंभर वर्षांचा विचार करत निर्णय घेतला पाहिजे
नेते शरद पवार यावेळी म्हणाले की, महाराष्ट्राला अनेक क्षेत्रात पुढे नेण्याचे प्रयत्न होत असताना कोकणला ‘इंटरनॅशनल ग्रीनफिल्ड इनोव्हेटिव्ह रिजन’ म्हणून विकसित करण्याची मोठी संधी आहे. कोकणात त्यासाठी अनुकुल वातावरण आहे. कोकणात बुद्धीमत्ता, सर्जनशीलता प्रचंड आहे. मुंबई विद्यापीठ, कृषी विद्यापीठ, मत्स्यविज्ञान संस्था या ठिकाणी आहेत. कोकणातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करुन घेत तेथील निसर्गाला हानी न पोहोचविता या विभागाचा विकास करणे शक्य आहे. पुढील पन्नास–शंभर वर्षांचा विचार करुन यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे, असेही शरद पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोरही या संकल्पनेचे सादरीकरण करुन त्यांच्या मान्यतेनंतर पुढे जावे, अशी सूचनाही शरद पवार यांनी केली.