मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. सुशांतने आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली? याचा तपास आता सीबीआय करत आहे. यासाठी सीबीआयच्या पथकाने सुशांतच्या संदर्भात सायकॉलॉजीकल अटोप्सी करण्याचा निर्णय घेतला आहे. याद्वारे तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून सुशांतच्या मृत्यूसाठी कुठल्या गोष्टी जबाबदार आहेत? याचा शोध घेतला जाणार आहे.
काय आहे सायकॉलॉजीकल अटोप्सी?
बहुतांशी केसेसमध्ये सायकॉलॉजीकल अटोप्सीची गरज भासत नाही. त्यासाठी केवळ मेडिकल अटोप्सीही पुरेशी असते. मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू हा आत्महत्या आहे, हत्या आहे की, अपघात आहे हे स्पष्ट होत नसल्यास सायकॉलॉजीकल अटोप्सीचा वापर करण्यात येतो. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यू आगोदार त्याची मेडिकल हिस्ट्री किंवा मानसिक ताणतणाव असेल तरीही सायकॉलॉजीकल अटोप्सी केली जाते. सुशांतसिंह राजपूतच्या केसमध्ये आत्महत्या, हत्या व अपघात या तिन्ही गोष्टींची शक्यता असल्याने त्याबाबत स्पष्टता मिळवण्यासाठी सीबीआयने सायकॉलॉजीकल अटोप्सी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय योग्य असल्याचे मत मानसोपचार तज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी व्यक्त केले.