मुंबई :महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिरातून ऐतिहासिक वस्तू गायब झाल्या आहेत. तुळजाभवानी देवीचे मौल्यवान, शिवकालीन दागिने चोरीला गेले आहेत. देवीच्या खडावा, माणिक, मोती, पाचूचे 8 ते 10 मौल्यवान अलंकार गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रकरणाची दखल घेत निधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
काय लिहिले आहे पत्रात :गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात उपसभापती नीलम गोऱ्हे लिहतात की, तुळजाभवानी मातेचे बहुसंख्य सोन्याचांदीचे दुर्मीळ पुरातनकालीन दागिने चोरी झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून माझ्या निदर्शनास आले आहे. यामध्ये, तुळजाभवानी मंदिरातील सोन्या-चांदीचे दागिने, देवीच्या पादुका, माणिक-मोती, वेगवेगळ्या राजे-महाराजांनी देवीचरणी अर्पण केलेली मौल्यवान दुर्मीळ नाणी यांचाही समावेश आहे. ही बाब अत्यंत गंभीर, संतापजनक असून या प्रकरणी, अतिउच्च दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष चौकशी पथक नेमण्याची मागणी गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आली आहे.