मुंबई - शरद पवार हे त्यांचे नेते आहेत. त्यामुळे ते सर्व नेते त्यांना भेटायला गेले असावेत, यात काही विशेष नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्र्वादीच्या बंडखोर नेत्यांनी रविवारी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यावरून आता नवीन राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत.
बंडखोर आमदारांनी घेतली शरद पवारांची भेट - रविवारी सकाळी देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या बंडखोर नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री वायबी चव्हाण सेंटरला पोहोचले. अजित पवार यांच्या गटाने शरद पवार यांची भेट घेतली. यात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, संजय बनसोडे आदींचा सहभाग होता. ही माहिती मिळताच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड देखील तातडीने वायबी चव्हाण सेंटरवर दाखल झाले होते.
शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्याकडे आलो होतो. राष्ट्रवादीने एकसंध राहावे, अशी विनंती आम्ही शरद पवार यांच्याकडे केली आहे. यावर शरद पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही - प्रफुल्ल पटेल, नेते, अजित पवार गट