मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर आहेत. सायंकाळी मुंबईत त्यांची जाहीर सभा होणार आहे. सभेच्या जागेची तयारी आणि सुरक्षेचा आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घेण्यात आला. त्यावेळी भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे देखील उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अनेक विषयांवर भाष्य केले. मुंबईतील समुद्रातील पाणी गोड करण्याचा प्रकल्प गेल्या पंधरा वर्षापासून पडून आहे. यामध्ये महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या पक्षाने कोणतीही पावले उचललेली नाहीत. अनेक पीपीटी प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या काळात बंद पडले. त्यामुळे पीपीटी प्रकल्पावर आदित्य ठाकरे यांनी बोलू नये असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.
टक्केवारी ठरत नव्हती म्हणून टेंडर काढले नाहीत :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील चारशे किलोमीटर रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी सहा हजार कोटींचे टेंडर काढले आहे. मात्र या कामांमध्ये मोठा घोटाळा असल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र आमचे सरकार आल्यानंतर मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्याच्या काँक्रिटीकरण करण्याचे टेंडर काढले आहे. महाविकास आघाडीच्या काळात टक्केवारी ठरत नसल्यामुळे हे टेंडर काढण्यात आले नसल्याची टीका प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून महानगरपालिकेत भ्रष्टाचार जो सुरू आहे. तो संपवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत असल्याचाही उद्गगार यावेळी फडणवीस यांनी केला.