मुंबई- केंद्र सरकारने अद्यापही ३० हजार कोटींचा निधी पाठवलेला नाही. मात्र निधी नाही म्हणून कामे थांबलेली नाहीत आणि थांबणार देखील नाहीत, असे अजित पवार विधानसभेत म्हणाले. तसेच गेल्या पाच वर्षात कुठे किती निधी दिला गेला हे आता मला सांगायला लावू नका, असा टोला भाजपला देत विरोधकांवर पुरवणी मागणीला उत्तर देताना निशाणा साधला.
बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपमध्ये गेलेत ते पुन्हा कधी परत येतील, हे त्यांना देखील कळणार नाही, असे सभागृहात सांगितले. पुरवणी मागण्यांवरून माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी भाजपला टोला हाणला. पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला ती सल भाजप नेत्यांच्या मनात आहे. आमच्या पाच जागा निवडून येतील, असे भाजपने सांगितले होते. मात्र, पराभव झाला तो पराभव या सगळ्यांच्या जिव्हारी लागल्याचे अजित पवार म्हणाले.
नागपूरची जागा गेल्याने एका गटाला आनंद, एका गटाला दुःख
भाजपच्या वाट्याला फक्त नंदुरबारची जागा मिळाली. ती देखील अमरीश पटेल यांना सोबत घेतल्यामुळे आली. ते कधीही आमच्याकडे येऊ शकतात, असे देखील अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच नागपूरची जागा गेल्याने एका गटाला आनंद झाला तर एका गटाला दुःख झाल्याचा टोलादेखील अजित पवार यांनी लगावला. एवढेच नाही तर नागपूरच्या पदवीधरच्या लोकांनी यांचा पराभव केल्यामुळे त्यांच्या मनाला खूप लागले असून पुण्यातही पदवीधरांनी यांना नाकारल्याची टीका अजित पवार यांनी केली.
कोरोना काळातही भाजपचे राजकारण
दरम्यान, कोरोना काळातदेखील भाजपने राजकारण केल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरून भाजपने राजकारण केल्याचे देखील अजित पवार म्हणालेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, कोरोना काळात आम्ही राजकारण केले नाही, पण मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी राजकारण केले. घाईने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला असता तर निर्णय घेण्यासाठी एवढी घाई का केली? असा प्रश्न विरोधकांनीच आम्हाला विचारला असता. त्यामुळे दोन्हीकडून बोलायचे अशी भूमिका विरोधी पक्ष घेत असल्याची टीका अजित पवार यांनी केली. एवढेच नाही तर महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात चांगले काम केले नाही, हा आरोप चुकीचा आहे असे देखील पवार यांनी म्हटले.