मुंबई :लॉंगमार्चमधील मान्य मागण्यांची अंमलबजावणी व्हावी यासाठी संबंधित मंत्री, मंत्रालयस्तरीय अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी यांची समिती बनविली जावी अशी मागणी केली होती. किसान सभेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या सोबत दिनांक 17 मार्च 2023 रोजी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा केली होती. किसान सभेच्या वतीने कॉम्रेड जे.पी. गावीत, आ. विनोद निकोले हे समितीत असावेत असे गावीत यांनी सुचविले होते. मात्र, मतदारसंघातील कामांमुळे मला समितीत वेळ देता येणार नसल्याने डॉ. अजित नवले यांना समितीत घ्यावे असे विनोद निकोले यांनी सूचना केली.
डॉ. अजित नवले यांना वगळले : आ. विनोद निकोले, डॉ. अशोक ढवळे, कॉम्रेड जे.पी.गावीत यांनी डॉ. अजित नवले यांचे नाव समितीत असावे असे मुख्य सचिव यांना एकमताने सांगितले. मान्य केलेल्या मागण्यांचे इतिवृत्त योग्यप्रकारे तयार व्हावे यासाठी कॉम्रेड गावीत यांनी दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. तेंव्हा समितीत डॉ. अजित नवले यांचे नाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले, असे का झाले असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असता त्यांना सुसंगत उत्तर मिळाले नाही.