मुंबई :राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा मनसे अध्यक्ष, राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटी मधील चर्चा गुलदस्त्यात असली तरी, तब्बल सव्वा तास त्यांच्या चर्चा रंगल्या. राज्यातील सध्याच्या परिस्थितीमध्ये फडणवीस - ठाकरे भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. परंतु या भेटी विषयी देवेंद्र फडवणीस यांना विचारले असता, राजकीय सोडून इतर सर्व गप्पागोष्टी झाल्या, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
राजकीय चर्चा सोडून फक्त गप्पागोष्टी :उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री अचानक शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या अगोदर ही भेट झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे त्याचबरोबर मनसे नेते बाळा नांदगावकर या दोघांपैकी एकाची होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या दृष्टिकोनातून ही भेट फार महत्त्वाची मानली जाते. या भेटीबाबत बोलताना, देवेंद्र फडवणीस यांनी राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे म्हटलं आहे. बऱ्याच दिवसापासून भेट होणार होती. अखेर काल मुहूर्त भेटला व आमच्या चर्चा झाल्या. परंतु त्यात राजकीय गप्पागोष्टी झाल्या नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
तुम्ही बातम्या चालवू शकता :या भेटीबाबत अधिक माहिती घेण्याचा पत्रकारांनी प्रयत्न केला असता. या भेटीत राजकीय विषय सोडून इतर विषयांवर फक्त गप्पा झाल्या. इतर कुठल्याही राजकीय चर्चा झाल्या नाहीत. पण तुम्हाला इतर कुठल्या बातम्या चालवायच्या असतील तर त्या तुम्ही चालवू शकता, माझी काहीच हरकत नाही, असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले आहेत.