मुंबई-कोरोना विषाणूची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिले असताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवले आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे.
मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा, या अर्थसंकल्पातही कायम आहे. महिलांच्या योजनांसाठी अर्थसंकल्पात भरीव काहीही दिसत नाही. प्राप्तीकर उत्पन्न मर्यादेत वाढ होऊन दिलासा मिळण्याची अपेक्षा असलेल्या मध्यमवर्गीयांच्या भावना संतप्त आहेत. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अर्थसंकल्पात यावेळीही अन्याय झाला आहे. महाराष्ट्रावरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील जनतेला न्याय्य हक्क मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले आहे.
निवडणुका असलेल्या राज्यांसाठी भरीव तरतूद
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या वाट्याला, अर्थसंकल्पातून भरीव काहीही आले नसून महाराष्ट्रावरील केंद्राचा आकस पुन्हा एकदा दिसून आला आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुका जवळ असल्याने केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पश्चिम बंगालला २५ हजार कोटी जाहीर केले, ते मिळतील याची खात्री नाही. पश्चिम बंगाल निवडणुकांमुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांना रविंद्रनाथ टागोरांची आवर्जून आठवण झाली, परंतु, ही आठवण करताना त्यांनी, देशाच्या अर्थव्यवस्थेची पहाट अंधारलेली असल्याचे सांगून आर्थिक आघाडीवर केंद्र सरकारचे अपयश कबूल केले असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
देशाचा अर्थसंकल्प नशिबावर सोडून चालणार नाही
भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याबाबतही अर्थमंत्री बोलल्या. क्रिकेटचा सामना नशिबाने साथ दिल्यास एकवेळ जिंकता येतो, परंतु देशाच्या अर्थसंकल्पासारखी गोष्ट नशिबावर सोडून चालणार नाही, हे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी समजून घ्यायला हवे होते. केंद्रीय अर्थसंकल्प हे आत्मनिर्भर बजेट असल्याचा ट्रेंड ट्विटरवर चालवला जातोय, परंतु हे आत्मनिर्भर नाही तर, देशाला बरबादीकडे नेणारे बजेट असल्याची टीका यावेळी अजित पवार यांनी केली आहे.
आत्मनिर्भर भारत योजनेवर पवारांची टीका
आत्मनिर्भर भारत योजनेसाठी जीडीपीच्या १३ टक्के निधी खर्च करण्याचे जाहीर केले आहे, यातला किती निधी नेत्यांच्या प्रसिद्धीवर आणि किती निधी लाभार्थ्यांना मिळणार हे स्पष्ट केलं असतं तर बरं झालं असतं. कोरोना संकटकाळात देशाच्या दिडशे कोटी लोकसंख्येपैकी ८० कोटी लोकसंख्येला प्रधानमंत्री कल्याण योजनेचा लाभ झाला हे, अर्थसंकल्पातूनच कळले. कोरोनाकाळात संघटीत, असंघटीत क्षेत्रातल्या अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असलेल्यांना गावी परतावे लागले. त्यांच्यासाठी तसेच कोरोनाकाळात मैलोनमैल उपाशीपोटी, अनवाणी गावी परतणाऱ्या मजूरांसाठी, त्यांच्या कुटुंबासाठी सरकारने काय मदत केली याचा कुठलाही उल्लेख या अर्थसंकल्पात दिसला नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. दरम्यान अर्थसंकल्पात केंद्रीय मंत्र्यांनी असंघटीत मजूरांसाठी पोर्टल सुरु करण्याची घोषणा केली. परंतु गेल्या काही वर्षांपासून देशातील बेरोजगारांचे सर्वेक्षण बंद आहे. बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली जात नाही, त्याबाबतही ठोस घोषणा होण्याची गरज असल्याचेही पवार यांनी म्हटले आहे.