ठाणे Ajit Pawar Reply To Jitendra Awhad: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्यातील शाब्दिक चकमकीला आता नवं वळण मिळालं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचा फोटो ट्विट करून त्यांच्या वाढलेल्या पोटावर टीका केली होती. त्यावर नाराज झालेल्या आव्हाडांनी आता अजित पवार यांचा फोटो ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार यांच्यावर मी कधीही वैयक्तिक टीका केली नाही. मात्र, त्यांनी विनाकारण ट्विट केल्यानं मी त्यांचा फोटो ट्विट केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय. माझा फोटो ट्विट करून आपलं वाढलेलं पोट दाखवणाऱ्या अजित पवारांचे सिक्स पॅक अस्वस्थ करणारे असतील असं मला वाटलं, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
अजित पवारांचं उत्तर :हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेबाबत अजित पवार यांना विचारण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते म्हणाले की, "आता पोट वाढलं, तर काय करू. पोट वाढलं, तर वाढलं, पण महिना गेलेला नाहीये, हे पण लक्षात ठेवा" असं म्हणत त्यांनी जितेंद्र आव्हाडाच्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी अजित पवारांचं उत्तर ऐकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हसू आवरता आलं नाही.