मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्या नंतर अजित पवार आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची, तर आठ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र, अकरा दिवस उलटूनही तिन्ही पक्षातील खाते वाटपाचा प्रश्न काही सुटलेला नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.
पक्ष श्रेष्ठीं सोबत करणार चर्चा :राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार असताना, तात्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. त्यावेळी शिवसेनेच्या नेत्यांना निधी मिळत नसल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. त्यामुळे शिंदे यांनी भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन केली होती. मात्र, आत्ता ज्यांच्यावर आरोप केले, तोच पक्ष सत्तेत सामील झाल्यामुळे शिंदे गटाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अजित पवारांना अर्थ खाते देण्यास शिंदे गटचा विरोध :भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील खातेवाटपाचा वाद मिटवण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री बैठक झाली. शिंदे गटाचा अजित पवारांना विरोध असल्याने खातेवाटपाचा निर्णय लांबणीवर पडत असल्याचे बोलले जात आहे. त्यातच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर शिंदे गट दावा करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसही आग्रही असल्याचे समोर येत आहे.