मुंबई- महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात नागरिकांना सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या, कोविड सेंटरची निर्मिती केली. चांगले काम करूनही विरोधक सरकारवर चिखलफेक करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल अभिभाषणावर बोलताना व्यक्त केली. तसेच राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या आणि घरगुती गॅसच्या किंमतीवर भाष्य केले. वाढती महागाई केंद्र सरकारने कमी करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्ती केली. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर आणि टीकेवर उपमुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली.
पुरावे द्या कारवाई करू
कोरोना काळात टाळेबंदी झाल्यावर जनतेत भीतीचे वातावरण पसरले होते. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राज्यात सर्व जिल्ह्यात आणि मुंबईत कोविड सेंटर निर्माण करण्यात आले. खासगी रुग्णालयेही ताब्यात घेतली. मोठ्या प्रमाणात आरोग्यव्यवस्थेची निर्मिती केली. असे करुनही संकट काळाता विरोधकांकडून संशयाच्या नजरेने पाहण्यात आले. उपाययोजना करताना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सुरू आहे. पण, विरोधकांनी भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचा पुरावा द्या, पुरावा दिल्यावर संबंधितावर तत्काळ कारवाई करू, असे स्पष्ट केले. या काळात अत्यंत वेगाने आणि कठोर निर्णय घेणे भाग पडले त्यामुळे त्या काळात काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या राजकारणामुळे त्या बदल्या झाल्या नसल्याचे सांगत विरोधकांचे आरोप उपमुख्यमंत्री पवार यांनी खोडून काढले.