मुंबई -राज्यातील शिक्षकांकडून वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाच्या नावाखाली शुल्क घेऊन तीन महिने उलटून गेले तरीही प्रशिक्षणाचे आयोजन न केल्याने शासनाकडून शिक्षकांना फसवले जात असल्याची टीका भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केली आहे. प्रशिक्षणाचे तातडीने आयोजन न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही बोरनारे यांनी शिक्षण विभागाला केला आहे.
शैक्षणिक संस्कृतीला अशोभनीय - राज्यातील वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांची 23 डिसेंबरपर्यंत सशुल्क नोंदणी झाली असून तीन महिने होत आले तरी, प्रशिक्षण सूरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाही. वरिष्ठ व निवड श्रेणीस पात्र शिक्षकांचे प्रशिक्षणाकरिता 22 नोव्हेंबर, 2021 च्या संचालनालयाच्या परीपत्रकान्वये महाराष्ट्रातील हजारो पात्र शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आलेली होती. प्रशिक्षणासाठी इतिहासात पहिल्यांदाच शिक्षण विभागामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणासाठी शिक्षकांकडून दोन हजार रुपये प्रशिक्षण शुल्क घेण्यात आलेले आहे. ही बाब महाराष्ट्राच्या शैक्षणिक संस्कृतीला अशोभनीय असल्याचा आरोप अनिल बोरनारे यांनी केला.