मुंबई- साथींचे आजार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून प्रयत्न केले जात असताना, दुसरीकडे मुंबईकर मात्र स्वत:च्या घरातच डेंग्यू, मलेरिया पोसत असल्याचे समोर आले आहे. मागील ३ महिन्यांत पालिकेच्या कीटकनाशक विभागाने तपासणी केली. इमारती, घरे आणि डास उत्पत्तींच्या सुमारे ४ लाखांहून अधिक ठिकाणी तपासणी केली असून यात ६०६ ठिकाणी मलेरिया, ३१०२ ठिकाणी डेंग्यू तर २७२४ ठिकाणी दोन्ही प्रकारचे डास आढळले आहेत. पालिकेने या सर्वाना नोटीस बजावली असून प्रत्येक दिवशी ३० जणांना नोटीस बजावण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
साथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत पालिकेकडून वर्षभर जनजागृती केली जाते. शिवाय धुम्र फवारणी, डास-उत्पत्ती स्थाने नष्ट करण्याचे काम सुरू असते. अस्वच्छता आणि पाणी साठून राहणार्या ठिकाणी डेंग्यू, मलेरियाचा प्रसार करणार्या डासांची उत्पत्ती होत असल्यामुळे ही ठिकाणे नष्ट केली जात आहेत. पावसाळा काही दिवसांवर आल्यामुळे या कामाचा वेग आणखी वाढला आहे. जानेवारीपासून केलेल्या या तपासणी आणि कारवाई मोहिमेत मुंबईकरांचा याबाबत निष्काळजीपणा समोर येत आहे. या तपासणीत ६०६ ठिकाणी मलेरिया पसरवणारे एनॉफिलीज स्टिफेन्सी डासांच्या अळ्या, ३१०२ ठिकाणी डेंग्यू पसरवणारा एडिस इजिप्तीच्या तर २७२४ ठिकाणी दोन्ही आजार पसरवणारे डास आढळले आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी डास उत्पन्न होणार नाहीत, अस्वच्छता पसरणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
दंडात्मक कारवाई होणार -
डेंग्यू-मलेरिया उत्पन्न करणारे ठिकाणे आढळल्यास पालिकेकडून आधी नोटीस पाठवली जाते. शिवाय दंडात्मक कारवाईदेखील केली जाते. यामध्ये पालिकेचे आदेश पाळले नाही तर न्यायालयीन कारवाईही करण्यात येते. पालिकेच्या कीटकनाशक विभागाने मागील जानेवारीपासून केलेल्या कार्यवाहीत तब्बल ८ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या संबंधित विभागाकडून देण्यात आली.