मुंबई- कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आज घाटकोपर व वडाळा बस डेपोबाहेर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने मूक निदर्शने केली. कोरोनामुळे अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांना सेवा देताना, वीज पुरवठा करताना मोठया संख्येने बेस्टचे कर्मचारी बाधीत झाले. तर आतापर्यंत 54 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र, हा आकडा लपवला गेल्याचा आरोप निदर्शनावेळी केला गेला.
54 बेस्ट कामगारांचा मृत्यू झालेला असताना प्रशासनाकडून ही आकडेवारी 9 दाखवण्यात आली आहे. सोबतच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील किती सदस्य कोरोनाबाधित झालेत याची माहिती बेस्ट प्रशासनाकडे उपलब्ध नाही. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना नोकरी तसेच विमा कवच द्यावे लागेल, यामुळे बेस्ट जाणीवपूर्वक ही माहिती लपवत असल्याचा आरोप संयुक्त कामगार कृती समितीने केला आहे.