पुणे:पुण्यातील उरुळी देवाची व फुरसुंगीची नगरपालिका करण्याच्या निर्णयानंतर वाघोली ची देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी आत्ता जोर धरू लागली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये समाविष्ट फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांची नवी नगरपालिका करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. या नगरपालिकेच्या माध्यमातून या गावांतील नागरिकांच्या नागरी सुविधांचा प्रश्न मार्गी लागेल.
वाघोली ची देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी माजी सरपंच संदीप सातव यांची मागणी: तसेच नागरिकांच्या सहभागातून ही नगरपालिका विकास कामांमध्ये एक सर्वोत्कृष्ट ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला आहे. यानंतर वाघोली ची देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी माजी सरपंच संदीप सातव यांनी केली आहे. पुणे महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही गावे पुन्हा महापालिकेतून वगळण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
नगरपालिका निर्माण करण्याची मागणी:या 2 गावांची एकत्रित नगरपालिका स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर आता महानगरपालिकेमध्ये समाविष्ट असलेल्या वाघोली ग्रामस्थांकडून देखील वाघोलीसाठी स्वतंत्र नगरपालिका निर्माण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुणे महानगरपालिका हद्दीलगतच्या गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश झाला होता. यामध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी यासह 11 गावांचा समावेश झाला. त्यानंतर वाघोली सह अन्य २३ गावाचा समावेश झाला.
वाढीव दराने कर आकारणी:मात्र कोणत्याही सुविधा नसतांना महापालिकेच्या मिळकत 'कराला' समाविष्ट गावांचा विरोध आहे, तर सर्वच खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे 'अर्थ'कारणाकडे लक्ष जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष असून ग्रामपंचायतीच्या तुलनेत वाढीव दराने कर आकारणी होत आहे. या तुलनेत गावांना सोयी-सुविधा मिळत नसल्याची ओरड या गावांची होती. यामुळे आता वाघोलीतील ग्रामस्थांकडून देखील स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात वाघोली ग्रामस्थांकडून विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे.