मुंबई - नागरी हक्कांसाठी जागरूक असलेल्या मुंबईकरांनी रविवारी प्राण्यांच्या हक्कांसाठी अनोखे आंदोलन केले. वर्सोव्याच्या यारी रोडवरील महापालिका उद्यानात 'आज की आवाज' या सेवाभावी संस्थेच्या पुढाकाराने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आगळ्यावेगळ्या आंदोलनात सहभागी झालेल्या तब्बल 150 हून अधिक प्राणीप्रेमी तसेच जागरूक नागरिकांनी एकमुखाने प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करण्यात यावा ही मागणी केली.
प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करा, प्राणीप्रेमींचे निषेध आंदोलन
नागरी हक्कांसाठी जागरूक असलेल्या मुंबईकरांनी रविवारी प्राण्यांच्या हक्कांसाठी अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात 150हून अधिक प्राणीप्रेमी तसेच जागरूक नागरिकांनी आपला सहभाग नोंदवला. तसेच एकमुखाने प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा अधिक कठोर करण्यात यावा ही मागणी केली.
मालाड येथील एका इसमाने एका कुत्रीला ठार मारून तिच्या 3 आठवड्यांच्या सहा पिल्लांना अनाथ केल्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही वर्षांत प्राण्यांना त्रास देण्याच्या, विशेषत: भटक्या कुत्र्यांच्या हत्या करण्याच्या घटना मुंबईत सातत्याने वाढत आहेत. मालाडसारख्या प्राण्यांना जीवे मारून टाकण्याच्या घटना भविष्यात रोखायच्या असतील तर प्राण्यांविषयी क्रूरता प्रतिबंधक कायदा कठोर करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. प्राण्यांनाही भावना असतात त्यांना समजणे गरजेचे आहे असे मत या आंदोलनाचे आयोजक आणि आज की आवाज या संस्थेचे अध्यक्ष प्रि. अजय कौल यांनी व्यक्त केले.
प्राण्यांची हत्या करून जर 20, 50 किंवा 100 रुपये इतका अत्यल्प दंड भरावा लागणार असेल, तर असा पोकळ कायदा प्राणी हत्या करण्यापासून एखाद्याला कसा काय रोखू शकेल? प्राण्यांविरोधातील क्रूरता, हिंसाचार रोखायचा असेल तर सरकारने या कायद्याअंतर्गतची शिक्षा आणखी कठोर करावी, हीच सर्व प्राणीप्रेमींची एकमेव मागणी असल्याचेही यावेळी सांगितले गेले.