मुंबई:राज्य सरकारने जिल्ह्याचे नामांतर करत धाराशिव हे नाव केले आहे तर औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराबाबत अजूनही संभ्रम आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यात आले आहे. मात्र, संपूर्ण जिल्ह्याचे नाव अजूनही बदलले गेलेले नाही. संपूर्ण जिल्ह्याचे नाव संभाजीनगर करावे या मागणीसाठी आता स्थानिकांकडून जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे संभाजीनगर हे नाव संपूर्ण जिल्ह्याचे करण्याबाबत राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान राज्यातील अन्य मुस्लिम नावे असलेल्या गावांची नावे बदलावी, अशी मागणी आता पुढे येऊ लागली आहे.
गावांना मुघल प्रशासकांची नावे: भारतावर मुघलांनी दीर्घकाळ राज्य केले होते. त्यामुळे देशातील आणि राज्यातील अनेक गावांची नावे मुघलांच्या नावावरून ठेवण्यात आलेली आहेत. यामध्ये अकबर, औरंगजेब, जहांगीर, शहाजान, बाबर यांच्या नावाचा अधिक वापर झालेला दिसतो. देशात अकबराच्या नावाने 252 गावे आणि शहरे आहेत. बाबराच्या नावाने 61 गावे आहेत. शहाजहानच्या नावाने 63 गावे आहेत. औरंगजेबाच्या नावाने 177 गावांची नावे आहेत तर जहांगीरच्या नावावर 141 गावांची नावे ठेवण्यात आल्याचे दिसून येते. मुघल प्रशासकांची नावे मुख्यत्वे उत्तर आणि मध्य भारतात अधिक गावांना दिल्याचे दिसून येते. यातील उत्तर प्रदेशात सर्वाधिक 396 गावांना मुघल प्रशासकांचे नाव आहे. बिहारमध्ये 97 गावांना मुघल प्रशासकांचे नाव देण्यात आले आहे. हरियाणामध्ये 39 गावांना मुघल प्रशासकांचे नाव आहे. महाराष्ट्र राज्यात सुमारे 50 गावांना मुघल प्रशासकांचे नाव देण्यात आलेले आहे.
राज्यातील प्रमुख मुस्लिम गावे: मुघल प्रशासकांच्या नावावरून अथवा त्यांच्या राजवटीवरून गावांना नावे देण्यात आल्याचे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दिसते. यापैकी अमरावती जिल्ह्यात सुलतानपूर, इस्लामपूर, बऱ्हाणपूर, खानापूर, इंदला, फतेपुर अशी नावे दिसतात तर सातारा जिल्ह्यात अरबवाडी, इब्राहिमपूर, रंदुल्लाबाद, मुसलमान वाडी याशिवाय पुणे जिल्हा जवळ मोहम्मद वाडी, हिमायतनगर, अहमदपूर अशा मुस्लिम राजवटीतील नावे गावांना दिली गेले असल्याचे दिसते. या गावांची नावे ताबडतोब बदलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरू लागली आहे. याशिवाय अन्य काही गावांच्या नामांतराची ही मागणी होऊ लागली आहे.
अन्य गावांच्या नामांतराची मागणी: सोलापूर जिल्ह्यातील सुलतानपूरचे नाव राहुल नगर तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे नाव ईश्वरपूर करावे अशी मागणी पुढे येत आहे. यासोबतच बुलढाणा जिल्ह्यातील उंदरी गावाचे नाव उदयनगर, पुणे जिल्ह्यातील वेल्हा गावाचे नाव राजगड, मळवली स्थानकाचे नाव एकविरा स्थानक, अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करावे तसेच पुणे जिल्ह्याचे नाव जिजानगर किंवा सावित्रीबाई फुले नगर करावे, अशी मागणी ही सातत्याने होताना दिसते आहे.