मुंबई - मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी नगरसेवकांना दिला जाणारा निधी कमी पडत आहे. यामुळे हा निधी वाढवून मिळावा. तसेच कोरोनाचा मुकाबला करत असतानाच आता पावसाळी आजारांचाही प्रादुर्भाव वाढणार असल्याने पालिकेचे रुग्णालय आणि हेल्थ पोस्ट अद्ययावत करण्यात यावेत. अशी मागणी करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालिकेतील गटनेत्या राखी जाधव यांनी दिली.
मुंबईत 11 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर आतापार्यंत मुंबईत 73 हजार 747 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा रुग्ण आढळून येताच पालिकेने रुग्णांवर उपचार करण्यास, अलगीकरण, विलगीकरण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी प्रत्येक नगरसेवकाला 10 लाखांचा निधी देण्यात आला. या निधीमधून अनेक नगरसेवकांनी आपल्या विभागात मास्क, अन्नधान्य, जेवण आदींचे वाटप केले. तसेच अन्नधान्याची पाकीटेही वाटली. विभागांमध्ये निर्जंतुकीरण करण्यासाठी औषध फवारणी केली. यामुळे गेल्या 3 महिन्यात हा निधी संपल्याने आता पुन्हा आणखी निधी वाढवून मिळावा अशी मागणी नगरसेवकांडून केली जात आहे. नुकत्याच झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत नगरसेवकांना आणखी निधी वाढवून देण्याची मागणी महापौर आणि पालिका आयुक्तांकडे करण्यात आल्याची माहिती राखी जाधव यांनी दिली.
मुंबईत एकीकडे कोरोनाचे संकट असताना पावसाळा सुरू होत आहे. पावसाळ्यात मुंबईत डेंग्यू, मलेरियासारखे आजार सुरू होतात. सध्या सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातच डेंग्यू, मलेरियासारखे आजार झाल्यास त्या रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करणे शक्य नाही. अशा रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून पालिकेच्या विभागात असलेले रुग्णालय हेल्थ पोस्ट अद्ययावत करून त्याठिकाणी रुग्णांवर उपचार करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी गटनेत्यांच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती राखी जाधव यांनी दिली.
१५ लाखांचा निधी -
मुंबई महानगरपालिकेने याआधीच नगरसेवक निधीतून आपल्या विभागातील रहिवाशांचे कोरोनापासून संरक्षण तसेच कोरोनाला रोखण्यासासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांसाठी १० लाख खर्च करण्यास नगरसेवकांना परवानगी दिली आहे. हा निधी पूर्ण खर्च झाल्यास आणखी पाच लाखांचा अतिरिक्त निधी खर्च करण्यास पालिकेने परवानगी द्यावी, या मागणीसाठी विधी समितीच्या अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी महापौर, पालिका आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला होता. ही मागणी पालिका प्रशासनाने मान्य केली आहे. त्यामुळे नगरसेवकांकडे आता कोरोनासाठी एकूण १५ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या अधिकच्या निधीमधून नागरिकांना आर्सेनिक या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे.