मुंबई: राज्य शासन सेवेतील शासकीय तसेच निमशासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याबाबत राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आलेला आहे. सरकारने याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याबाबत वेळोवेळी आश्वासन दिले आहे. परंतु सरकार राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे कधी करणार? याकडे संपूर्ण राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. अन्यथा आंदोलन करण्याची वेळ आणू नये असा इशारा, राजपत्रित अधिकारी महासंघाने दिला आहे.
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय: देशामध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत मोठा निर्णय घेतलेला आहे. याच धर्तीवर देशातील बहुतांश राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे केले आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याबाबत अद्यापपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. या मुद्द्यावर राज्य सरकारने आंदोलन करण्याची वेळ आणू नये असा इशारा, राजपत्रित अधिकारी महासंघाने दिला आहे. शिंदे-फडणवीस-पवार सरकार या प्रश्नाबाबत विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे. मात्र अधिवेशन काळात हा निर्णय घ्यावा या मागणीसठी कर्मचारी आग्रही आहेत.