मुंबई: महाराष्ट्रामध्ये असलेल्या जिल्ह्यांपैकी औरंगाबाद उस्मानाबाद आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांची नावे तसेच सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर तालुक्याचे नाव मुस्लिम आहेत. या तीनही जिल्ह्यांची नावे बदलण्याची मागणी गेले कित्येक वर्षे केली जात आहे. यानुसार औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली होती ही नावे बदलण्यास केंद्र सरकारने ही मंजुरी दिली असल्याने या दोन्ही जिल्ह्यांची नावे आता बदलण्यात आली आहे.
इस्लामपूर नामांतराची मागणी: औरंगाबाद, उस्मानाबाद जिल्ह्याप्रमाणे अहमदनगर या जिल्ह्याचे तसेच इस्लामपूर तालुक्याचे नाव बदलण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेकडून अहमदनगरचे नाव अंबिका नगर, हिंदू राष्ट्र सेनेकडून श्रीराम नगर करण्याचे तर आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहिल्याबाई होळकर नगर असे नामांतर करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या तालुक्याचे नाव ईश्वर करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. संभाजी भिडे यांच्या शिव प्रतिष्ठान या संघटनेने सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देवून इस्लामपूर नाव ईश्वरपुर करण्याची मागणी केली आहे.
प्रस्ताव केंद्राला पाठवणार: दरम्यान, अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच नाव देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली याबाबतचा प्रश्न आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला होता. त्यावर अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच नाव देण्यात यावं असा प्रस्ताव केंद्र सरकारला लवकरच पाठवण्यात येणार आहे अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली होती.