मुंबई - शहरातील रस्त्यांवर पावसाळ्यात दरवर्षी खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने यावर्षी १२०० टन कोल्डमिक्स मिश्रण बनवून हे कोल्डमिक्स पालिकेच्या सर्व वॉर्डमध्ये वाटप केले. मात्र, त्यानंतर पालिकेने मुंबईमधील बहुतेक खड्डे पेव्हर ब्लॉक आणि डेब्रिजने भरले आहेत. यामुळे हे कोल्डमिक्स गेले कुठे? असा प्रश्न निर्माण करण्यात येत आहे. खड्डे बुजवण्यासाठी कोल्डमिक्सचा वापरच केला गेला नसल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी दक्षता विभागाकडून चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा व माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी केली आहे.
मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. हे खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने अनेक तंत्रज्ञानाचा वापर केला. त्यात अस्फाल्ट (डांबर), कार्बनकोअर, हॉटमिक्स, कोल्डमिक्स आदी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. मात्र त्यानंतरही अद्याप खड्डे बुजवण्यास पालिकेला अपयश आले आहे. २०१३ - २०१८ या कार्यकाळात पालिकेने २० ते ३० हजार टन हॉटमिक्स वापरून खड्डे बुजवले. मात्र, गेल्या दोन वर्षात खड्डे बुजवण्यासाठी पालिका कोल्डमिक्स हे तंत्रज्ञान वापरत आहे.
कोल्डमिक्सचा वापर करून खड्डडे बुजवले जातात असा दावा पालिका करत आहे. यावर्षी १२०० टन कोल्डमिक्स पालिकेने तयार करून आपल्या २४ विभाग कार्यालयात वाटपदेखील केले. पालिकेच्या विभाग कार्यालयात कोल्डमिक्स पाठवण्यात आले असले तरी खड्डे मात्र पेव्हर ब्लॉक आणि डेब्रिज टाकून बुजवले जात आहेत. २०१७ - १८ मध्ये पालिकेने ३९८१ खड्डे बुजवले आहेत. एक खड्डा बुजवण्यासाठी पालिकेने ५ टन कोल्डमिक्स वापरले आहे. त्यामुळे कोल्डमिक्सचा भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी दक्षता विभागाकडून करावी अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी केली आहे.