मुंबई - 'गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाचा प्रसार सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाच्या तीन व्हेरिएंटचा प्रसार झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट घेऊन आलेला डेल्टा व्हेरिएंट, तसेच त्यात बदल झालेला डेल्टा प्लस व्हेरिएंट हा गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूपेक्षा अधिक गतीने पसरतो. कोरोनापेक्षा तो ५० टक्क्यांहून अधिक वेगवान आहे', अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. तर डेल्टा प्लस हा हवेतून गर्दीच्या ठिकाणी आणि बंद खोलीत पसरतो, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.
'डेल्टा-डेल्टा प्लसची प्रसार क्षमता अधिक, काळजी घेण्याची गरज'
मुंबईमध्ये गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरु झाला. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक होती. पहिल्या लाटेत जितके रुग्ण आढळून आले, त्यापेक्षा जास्त रुग्ण दुसऱ्या लाटेत तेही गेल्या तीन ते चार महिन्यात आढळून आले आहेत. दुसऱ्या लाटेचा प्रसार कमी होत असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर काकाणी यांनी ही माहिती दिली. 'कोरोना विषाणूप्रमाणेच डेल्टा आणि डेल्टा प्लसवर उपचार केले जातात. याची उपचारपद्धती सारखीच आहे. मात्र, कोरोनाच्या पहिल्या विषाणूपेक्षा डेल्टा आणि डेल्टा प्लसची प्रसार क्षमता अधिक आहे. यामुळे काळजी घेणायची गरज अधिक आहे. कोरोनाच्या त्रिसूत्रीची म्हणजेच मास्क घालणे, हात सतत धुणे आणि गर्दीत कमी प्रमाणात जाणे याची अंमलबजावणी केल्यास विषाणूपासून बचाव होऊ शक', असे काकाणी यांनी सांगितले.
हवेतून, बंद खोलीत पसरतो डेल्टा -
'मुंबईत गेल्यावर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार आहे. गेल्यावर्षी आलेला कोरोना विषाणू हा पृष्ठभागाद्वारे पसरत होता. मात्र, त्यात बदल होऊन डेल्टा हा व्हेरिएंट आला. त्यात आता पुन्हा बदल होऊन डेल्टा प्लस या विषाणूचा प्रसार सुरू झाला आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लस हे दोन्ही विषाणू हवेतून पसरतात. गर्दी आणि बंद खोलीत डेल्टा आणि डेल्टा प्लसचे विषाणू पसरतात', अशी माहिती केईएमचे डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले.