मुंबई- पूर्व उपनगरात हत्यांचे सत्र सुरू आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एका डिलिव्हरी बॉयची धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या झाल्याची घटना विक्रोळी सर्व्हिस रोड लगत असलेल्या भुयारी मार्गावर घडली आहे.
विक्रोळीमध्ये डिलिव्हरी बॉयची धारदार शस्त्राने हत्या
तेजकुमार राम (वय 22 वर्षे) असे मृत युवकाचे नाव आहे. तेजकुमार हा सर्व्हिस रोड वरून पार्सल देण्यासाठी जात असताना दोघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जवळील महात्मा फुले रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हत्या करून आरोपी हे घटनास्थळावरून फरार झाले आहेत.
त्यांची ओळख अजून पटली नसून पोलीस त्या दोघांचा शोध घेत आहे. लुटण्याचे हेतूने ही हत्या केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. तेजकुमार हा गायक सुद्धा होता. त्याचे अनेक व्हिडिओ हे युट्युबवरही आहेत. पूर्व उपनगरात गुन्हेगारी फोफावली असून पोलिसांचा धाक आता उरला नसल्याचे सामान्य नागरिक बोलत आहेत.
विक्रोळीत गुन्हेगारी वाढली आहे. गेल्या आठवड्याभरात 4 घरफोडी झाल्या आहेत. विक्रोळी पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिला नाही. पोलिसांनी लवकरात लवकर या आरोपींना अटक करावी, असे स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत यांनी सांगितले.