मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत घेत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला वचन दिले आहे. ते अध्यादेशाविरोधातील लढ्याला पाठिंबा देतील. आम्ही नातेसंबंध जपवणारे लोक आहोत. राजकारण आपल्या जागी आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
सीबीआयने शिवसेनेचे सरकार पाडले : 8 वर्षांच्या प्रदीर्घ लढाईनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला दिल्ली चालवण्याचा अधिकार मिळाला आहे. आठ दिवसांत केंद्र सरकारने अध्यादेश काढून ते अधिकार परत घेतले. लोकशाहीत निवडून आलेल्या सरकारकडे सत्ता असली पाहिजे. लोकशाहीत सत्ता लोकांनी चालवली पाहिजे. भाजपचे लोक न्यायाधीशांच्या विरोधात मोहीम चालवतात. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून शिवसेनेचे सरकार पाडण्यात आले. दिल्लीतही आमच्या आमदारांना विकत घेण्यासाठी ऑपरेशन लोटस चालवण्यात आले. पंतप्रधानांचे नाव न घेता ते म्हणाले की, अशी व्यक्ती देश चालवू शकत नाही. ते अहंकारात जगत आहेत. एवढेच नाही तर, पंजाबच्या राज्यपालांनी यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ दिले नाही. त्यामुळेच राज्यसभेतील सर्व विरोधी पक्षांनी मिळून केंद्राची विधेयके राज्यसभेत फेकणे गरजेचे आहे. असे झाले तर 2024 नंतर हे सरकार पुन्हा येणार नाही.
'या देशात लोकशाही कायम ठेवण्यासाठी आपण सगळे एकत्र आहोत. आज पासून आपण सत्ताधाऱ्यांना विरोधी म्हटलं पाहिजे. गेल्या काही दिवसात सर्वोच्च न्यायालयाने दोन महत्वाचे निकाल दिले आहेत. आपच्या संदर्भात जो निर्णय दिला तो लोकशाहीसाठी आवश्यक होता. पण, केंद्राने अध्यादेश आणला. राज्यांचा अधिकार काढून घेतला. 2024 नंतर राज्यात निवडणूक होणारच नाही अशी परिस्थिती निर्माण होईल."- उद्धव ठाकरे