मुंबई: खारघर येथे मागच्या रविवारी झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी उष्माघाताने १४ श्री सेवकांचा मृत्यू झाला आहे. यावरून राजकारण तापलं असताना सरकारने आज या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची एक सदस्यीय समिती घोषित केली आहे. ही समिती एका महिन्याच्या आत या संदर्भात अहवाल सादर करणार आहे.
श्री सेवकांच्या आग्रहास्तव कार्यक्रम दुपारी: मागच्या रविवारी खारघर येथे पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यादरम्यान उष्माघाताने मृत पावलेल्यांचा आकडा वाढत असल्याने सध्या विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाची उच्च स्तरातून निवृत्त न्यायाधीश यांच्याकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. सरकारने महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांची या प्रकरणी चौकशीसाठी नियुक्ती केल्याने विरोधक नाराज झाले आहेत.
सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न :दरम्यान, या घटनेवर बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः हा कार्यक्रम सायंकाळी घेण्यात यावा अशी इच्छा प्रकट केली होती. परंतु श्री सेवकांना कार्यक्रम आटोपल्यानंतर घरी जाण्यास फार उशीर होईल, तसेच कार्यक्रम जरी सायंकाळी ठेवला तरीसुद्धा श्री सेवक सकाळपासूनच येऊन कार्यक्रमस्थळी बसतील. म्हणूनच श्री सेवकांच्या आग्रहास्तव कार्यक्रम दुपारी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हे सर्व शिस्तबद्ध श्रीसेवक आहेत. ते जिथे जातात तेव्हा सोबत जेवणाचे डब्बे आणि पाण्याच्या बाटल्याही घेऊन जातात. इथे सुद्धा त्यांनी स्वतःचे डब्बे व पाण्याच्या बाटल्या बाळगल्या होत्या. पण, निसर्गाचाच प्रकोप झाला. पंढरपुर वारीलाही लाखो भक्तजन जातात तेथेही अशा पद्धतीच्या घटना होत असतात, असे सांगत श्रीसेवकांना त्यांच्या देवाचे दर्शन घ्यायचे होते, हीच त्यांची इच्छा होती. तसेच मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची फौज तैनात करूनही अशी दुर्घटना घडली हे दुर्दैव असल्याचे सांगत, केसरकरांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.