मुंबई Deepak Kesarkar On Uddhav Thackeray : आमची बाजू सत्याची असून ती आम्ही मांडली आहे. देशात असलेली लोकशाही पक्षातही असायला हवी. मात्र ठाकरे लोकशाही मानत नव्हते. त्यामुळं त्यांना निवडणूक आयोगानं नाकारलं, असा हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी केला. त्यांनी पक्षात घटना बदलली, त्याला निवडणूक आयोगाची मान्यताही घेण्यात आली नाही. त्यामुळं उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाला कोणताही आधार नाही, अशी टीकाही मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
पक्षाच्या घटनेमध्ये करण्यात आला बदल :शिवसेना पक्षात फुट पडल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट पडले आहेत. मात्र शिवसेना पक्षात लोकशाही नव्हती असा, हल्लाबोल मंत्री दीपक केसरकर यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घटना बनवली, ती निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार लोकशाहीपूरक होती. मात्र त्यानंतर घटनेमध्ये बदल करण्यात आला होता. त्यानुसार आपणच लोकांना निवडायचं आणि त्यांनीच आपणाला निवडून द्यायचं असा प्रकार होता. मात्र याबाबत निवडणूक आयोगाची मान्यताच घेण्यात आली नव्हती. ही दुरुस्ती जेव्हा सादर करण्यात आली, तेव्हा ती निवडणूक आयोगाने नाकारली. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला, त्याला कोणताही आधार नाही, अशीही टीका मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी केली.