मुंबई:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस सातारा दौऱ्यावर आहेत. ते सातारा दौऱ्यावर जाण्यामागे देवीच्या पूजेचे कारण दिले जात आहे. तर कुटुंबीयांसोबत ते विश्रांतीसाठी गेल्याचा दावा त्यांच्या पक्षाच्या मुख्य प्रवक्त्यांनी केला आहे. मात्र मुख्यमंत्री सत्ता संघर्षाच्या काळात अचानक मुंबई बाहेर गेल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.
मुख्यमंत्री पदासाठी कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी: दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करीत नागपूरमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोस्टर लावले. हे पोस्टर काही वेळात काढून घेण्यात आले. तर दुसरीकडे धाराशिव मध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांच्या समर्थकांनी पोस्टरबाजी केली. मुख्यमंत्री अचानक सुट्टीवर गेल्यानंतर घडलेल्या या घटनांनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. तर काहीतरी राजकीय उलथापालत होणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पोस्टर्स काढून टाकण्याविषयी सांगितले असून यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्र्यांनी घेतली विश्रांती: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नंतर जर कोणी अठरा तास काम करत असेल तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काम करत असतात. रात्री दोन वाजता सलाईन घेऊन आणखी काम करताना आम्ही त्यांना स्वतः पाहिले आहे. त्यामुळे शेवटी प्रकृती पेक्षा काहीही मोठे नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना विश्रांती घेण्यासाठी सक्तीने सांगितले असेल तर त्यात गैर नाही. त्यांचा मुलगा स्वतः डॉक्टर आहे. त्यामुळे ते विश्रांतीसाठी साताऱ्याला गेले आहेत. मात्र तरीही ते तिथेही काम करीत असल्याचे केसरकर यांनी सांगितले.