मुंबई - मुंबईत सध्या लसीकरणाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यासाठी विभागवार लसीकरण केंद्रे उभारली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून चारकोप सेक्टर 3मधील प्रसुतीगृह येथे लसीकरण केंद्र उभारण्यात आले. त्या केंद्राचे लोकार्पण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते बुधवारी (5 मे) करण्यात आले. तसेच महापौरांनी क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा फुले मंडईतील गाळेधारकांच्या समस्या, पुनर्विकास कामाची पाहणीही केली.
'नोंदणी करूनच लसीकरणाला या'
'सध्या लसींचा मर्यादित स्वरूपात पुरवठा होत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. लसीकरण केंद्रांकडून कन्फर्मचा संदेश प्राप्त झाल्यानंतरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सद्यस्थितीत नागरिकांच्या दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येत आहे', असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. चारकोप सेक्टर 3मधील प्रसुतीगृह येथील लसीकरण केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी आमदार विलास पोतनीस, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
'डिजिटल माहिती फलक लावा'
'लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी किती नागरिकांचे लसीकरण आज झाले, याची माहिती दर्शविणारा डिजिटल माहिती फलक लावा. या माहितीमुळे २०० नागरिकांचे लसीकरण होऊ शकेल. एवढी लस उपलब्ध असताना चारशे नागरिकांना उपस्थित राहावे लागणार नाही. तसेच ज्या नागरिकांचे लसीकरण आज होणे शक्य नाही, परंतु जे नागरिक लसीकरण केंद्रांवर आलेले आहेत त्यांना दुसऱ्या दिवशीचे टोकन देण्यात यावे. दुसऱ्या दिवशीसुद्धा या टोकन दिलेल्या नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे', असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले.