मुंबई- राज्यात कोरोनाने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. राज्यात दररोज 60 ते 63 हजार नवे कोरोना रुग्ण आढळत असून यात ऑक्सिजनची गरज लागणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळेच पहिल्या लाटेत जिथे दिवसाला राज्यात 800 ते 850 मेट्रिक टन ऑक्सिजन लागत होता, तिथे आता दुसऱ्या लाटेत ही मागणी थेट प्रतिदिन 1500 मेट्रिक टनवर गेल्याची माहिती डी आर गहाणे, सहआयुक्त, (औषध), मुख्यालय, अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे. गंभीर बाब म्हणजे सध्या राज्यात दिवसाला 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. हे सर्वच्या सर्व ऑक्सिजन केवळ कोविड रुग्णांसाठी वापरले जात आहे. असे असताना 300 मेट्रिक टनचा तुटवडा राज्यात असून ही मागणी कशी पूर्ण करायची, असा मोठा प्रश्न एफडीए आणि आरोग्य यंत्रणेसमोर आहे.
राज्यात सहा लाखांहून अधिक रुग्ण सक्रिय
मार्च 2020 मध्ये राज्यात कोरोनाचा शिरकाव झाला. एप्रिल-मे मध्ये कोरोनाने कहर सुरु केला. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये 20 ते 23 हजाराच्या घरात रुग्ण आढळू लागले. डिसेंबरपासून मात्र कोरोनाचा कहर कमी कमी होत गेला. परिणामी दररोजचा रुग्णांचा आकडा अगदी 2500च्या घरात आला होता. त्यामुळे नागरिक आणि आरोग्य यंत्रणानाही मोठा दिलासा मिळाला होता. पण 2021 मार्चमध्ये, मात्र कोरोनाने हाहाकारच उडवून दिला. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत दररोज राज्यात 60 हजाराहून अधिक रुग्ण बाधित होत आहेत. सध्या राज्यात 6 लाख 38 हजार 34 रुग्ण सक्रीय आहेत. आतापर्यंत राज्यात 37 लाख 3 हजार 584 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत 30 लाख 4 हजार 391 रुग्ण बरे झाले आहेत. त्याचवेळी 59 हजार 551 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज सक्रिय असलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने ऑक्सिजनची गरज लागणाऱ्या रुग्णांची संख्या आहे.
एफडीए हतबल
कोरोना हा फुफ्फुसाशी संबंधित आजार आहे. कोरोना विषाणू मोठ्या संख्येने फुफ्फुसावर हल्ला करत फुफ्फुसाला इजा करत आहे. त्यामुळे रुग्णांना दम लागत असून त्यांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत आहे. पहिल्या लाटेत रुग्णसंख्या 23 हजारवर गेली आणि ऑक्सिजनची गरज वाढली. तेव्हा एफडीएने 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक वापरासाठी देणे बंधनकारक केले. दरम्यान राज्यात दिवसाला 1200 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत होती. तर ऑक्सिजनची मागणी 800 ते 850 टन प्रतिदिन होती. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा पहिल्या लाटेत सुरळीत होता. पण आता दुसरी लाट खूप मोठी असून रुग्णांचा रोजचा आकडा 60 ते 63 हजाराच्या घरात जात आहे. परिणामी ऑक्सिजनची मागणी प्रति दिन थेट 1500 मेट्रिक टनवर गेली आहे. राज्यात 1200 मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होत असताना आणि सर्वच्या सर्व ऑक्सिजन कोरोनासाठीच वापरले जात असताना 300 मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात आहे. ऑक्सिजन पुरवठयाची परिस्थिती गंभीर आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करत आहोत. पण ऑक्सिजनच शिल्लक नसल्याने आमच्या प्रयत्नांना यश येताना दिसत नाही असे म्हणत एफडीएने हतबलता व्यक्त केली आहे.
कर्नाटक, छत्तीसगड आणि प. बंगालला साकडे