मुंबई- राज्यात कोरोना नियंत्रणात आल्याचे आता तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. सप्टेंबरमध्ये जिथे राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा 24 हजारांच्या घरात गेला होता तिथे आता हा आकडा अडीच ते पाच हजारांच्या दरम्यान आला आहे. एकूणच राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे राज्यात कोरोना चाचण्या कमी झाल्याचे ही चित्र आहे. ऑक्टोबरमध्ये जिथे 80 ते 85 हजार चाचण्या होत होत्या तिथे आता हा आकडा 60 हजारांवर आला आहे. चाचण्या कमी झाल्याने रुग्ण कमी आढळत असल्याची एक ओरड यानिमित्ताने ऐकायला मिळत आहे. पण, मुळात रुग्णांची संख्या घटल्याने त्यांच्या संपर्कातील संशयितांचीही संख्या कमी झाली आहे. त्यामुळे चाचण्या कमी होत असून ही एक प्रकारे दिलासादायक बाब असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितली जात आहे.
एप्रिल-मे पासून चाचण्यांवर देण्यात आला भर
मार्चमध्ये राज्यात पहिला कोरोना रुग्ण पुण्यात आढळला. चीन आणि इतर देशातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यातील आरोग्य यंत्रणा मार्चमध्ये सज्ज होती. पण, हा नवा आजार असल्याने त्यावर कोणतेही औषध नसल्याने वा त्याबाबत संशोधन नसल्याने डॉक्टर, तज्ज्ञांचीही चिंता वाढली होती. पण, एक मात्र नक्की होते की हा आजार झपाट्याने वाढणारा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात आलेल्याचा शोध घेत त्यांची कोरोना चाचणी करत त्यांना क्वारंटाइन करण्याची पध्दती सुरुवातीपासूनच अवलंबण्यात आली. तर पुढे ताप-सर्दी-खोकला अशी लक्षणे आढळणाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले. परिणामी कोरोना चाचण्याचा आकडा वाढत गेला. 5-10 हजारांहून 25-30 हजार आणि पुढे आरटी-पीसीआर चाचणीच्या जोडीला अँटीजन चाचणी पध्दतीही आली. तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये रुग्ण वाढल्याने ट्रेसिंग-टेस्टिंगचेही प्रमाण वाढले. त्यामुळेच ऑक्टोबरमध्ये 80 ते 85 हजार कोरोना चाचण्या दिवसाला होऊ लावल्याची माहिती राज्य सर्व्हेक्षण अधिकारी (एकात्मिक रोग सर्व्हेक्षण कार्यक्रम, महाराष्ट्र) डॉ. प्रदीप आवटे, यांनी दिली आहे.
चाचण्या झाल्या कमी