मुंबई :मुंबईत २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी काही तासात ९०० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडला होता. त्यानंतर गेल्या काही वर्षात २ ते ३ तासात २०० ते ३०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होत आली आहे. तसेच निसर्ग, तोक्ते यासारखी वादळे आली आहेत. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने पाणी साठून मुंबई ठप्प होते. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी पाऊस, तापमान, हवेचा वेग, वादळ याची माहिती नागरिकांना देता यावी म्हणून पालिकेने ६० अतिरिक्त स्वयंचलित हवामान केंद्र बसवण्याच्या निर्णय घेतला आहे.
६० स्वयंचलित हवामान केंद्र :राष्ट्रीय किनारपट्टी संशोधन केंद्राने (एनसीसीआर) पावसाचे अचूक मोजमाप करण्यासाठी आणि एकात्मिक पूर पूर्वसूचना प्रणालीची पूर अंदाज क्षमता वाढविण्यासाठी संपूर्ण मुंबईत ९७ अतिरिक्त स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याची शिफारस केली होती. त्यापैकी महापालिकेने ६० स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्यासाठी निविदा काढल्या आहेत. या प्रकल्पासाठी निविदाकार रिअल टाइम पावसाची माहिती प्रदर्शित करणे आणि आपत्ती व्यवस्थापन वेबसाइट आणि अॅपची देखभाल करण्याची जबाबदारी देखील पार पाडणार आहे. ही हवामान केंद्रे महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन ऑपरेशन सेंटरशी जोडलेली आहेत.
नागरिकांना त्रास कमी होणार :स्वयंचलित हवामान केंद्राकडून मिळालेल्या आकडेवारीत पावसाचे प्रमाण, पावसाची तीव्रता, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा इत्यादींचा समावेश आहे. राष्ट्रीय किनारपट्टी संशोधन केंद्राने एडब्ल्यूएस कोठे उभारले जाऊ शकते, हे ओळखण्यासाठी पालिकेला काही जागांची सूचना केली आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राकडून मिळालेली माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून नागरिकांना पाठवली जाणार आहे. यामुळे पाऊस, हवामान, वादळ आदींची माहिती त्वरित नागरिकांना मिळणार असल्याने त्यांचा होणारा त्रास कमी होणार आहे.
स्वयंचलित हवामान केंद्र कुणाच्या फायद्यासाठी ? अमरावतीतशेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा आणि शेतीचे संभाव्य नुकसान टळावे, या उद्देशाने उभारलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांची स्थिती गंज चढल्यागत झाली आहे. ग्रामीण भागातील मंडळ कार्यालयांतर्गत उभारलेल्या या हवामान केंद्रांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहे. हवामानाची नोंद घेणारे काही यंत्रे झुडपामध्ये झाकून गेली आहेत. हवामान केंद्र मंडळाच्या शेवटच्या टोकाला बसविल्यामुळे हवामानाची अचूक नोंद होणार कशी? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकारामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे विमा कंपनीचा कोट्यावधी रुपयांचा फायदा होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा : Today Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग