मुंबई - कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून विद्यार्थ्यांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र, ऑनलाईन परीक्षेत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून कॉपी करण्याची माहिती समोर आली होती. या कॉपीबहाद्दरांना आळा घालण्यासाठी महाविद्यालयांनी यंदाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी सक्षम सॉफ्टवेअर वापरण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लीलाधर बनसोडे यांनी दिली.
हेही वाचा -रेल्वे हमालांवर दुष्काळात तेरावा; सामान वाहण्यासाठी खासगी कंपनीकडून ट्रॉलीचा प्रस्ताव
सक्षम सॉफ्टवेअरचा वापर करणार
मुंबई विद्यापीठाने ६ ते २१ मे या कालावधीत महाविद्यालयांना त्यांच्या स्तरावर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. यानुसार महाविद्यालये स्थानिक पातळीवर तयारी करत आहेत. यंदा या परीक्षा ऑनलाईन असल्या तरी यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती. त्यात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांकडून कॉपी केली जात होती. ऑनलाईन परीक्षेदरम्यान घरात समोर कोणाला तरी बसवून मोठ्याने प्रश्न वाचणे आणि त्याने 'गुगल' करून उत्तर सांगायचे इथपासून ते बाजुला दुसरे उपकरण ठेवून उत्तर शोधण्याचे प्रयत्न होत होते. त्यामुळे, कॉपीबहाद्दरांना आळा घालण्यासाठी महाविद्यालयांनी अधिक सक्षम सॉफ्टवेअर वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
'गुगल मीट', 'झूम'द्वारे विद्यार्थ्यांवर नजर
गतवर्षी झालेले कॉपीचे प्रमाण आणि वाढलेल्या निकालाची टक्केवारी लक्षात घेता यंदा शहरातील नामांकित कॉलेजांनी कॉपीबहाद्दरांना अटकाव करण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्याचा विचार केला आहे. याचबरोबर प्रोक्टेड पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवली जाणार असल्याचे एका प्राध्यापकाने सांगितले. विशेष म्हणजे, 'गुगल फॉर्म'च्या आधारे होणाऱ्या या परीक्षेत प्रोक्टेड पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. याचबरोबर 'गुगल मीट' अथवा 'झूम कॅमेरा'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवले जाणार आहे.
हेही वाचा -मुंबईत कोरोना वाढला; राणीबाग ३० एप्रिलपर्यंत राहणार बंद