मुंबई -राज्यात शहरी आणि ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. अशातच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मात्र शाळा सुरू करण्याची घेतलेली आठमूठी भूमिका पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मुंबई, ठाणे महापालिकेने आमच्या क्षेत्रातील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत सुरू करू शकत नाही, अशी भूमिका घेतल्याने यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले आहे.मात्र, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार असून भविष्यात शाळा सुरू करताना स्थानिक शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी म्हटले.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केला होता. त्यानंतर त्यांच्या विभागाने यासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या होत्या. अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली कार्यवाही सुरू करण्यात आली होती. राज्यभरातील शाळा सुरू होणार असल्याने शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्याही करण्यात आल्या. मात्र, आज मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपूर्वी शाळा सुरू करू शकत नाही, असे जाहीर केल्यानंतर शिक्षणमंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.
निर्णयाची त्यांना खूपच घाई असते-
राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यासाठी सर्वांगिण विचार करण्याची गरज होती. परंतु, शिक्षणमंत्र्यांनी तसा विचार केला नाही. त्याचीच पुनरावृत्ती त्यांनी आताही केली. त्यांना कोणत्याही निर्णयाची कायम घाई असते. यामुळेच त्यांनी हा चुकीचा निर्णय घेतला, अशी टीका शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केली आहे.
जुलै महिन्यातही केली होती घाई-
कोरोनाचा कहर सुरू असताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जुलै महिन्यातच शाळा प्रत्यक्षात सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यासाठी शासन निर्णय काढून त्या मोकळ्या झाल्या होत्या. तर दुसरीकडे शाळा सुरू होऊ शकत नाहीत, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी सुधारीत शासन निर्णय काढण्यासाठीही वेळ लावला होता. आता पुन्हा एकदा त्या शाळा सुरू करण्याच्या प्रश्नावर तोंडघशी पडल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
शाळा बंदच्या निर्णयात संभ्रमावस्था-
31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू होणार नाही. या निर्णयामुळे उलट संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आदेशात हा निर्णय फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे. मग शिक्षकांनी नेमके काय करायचे. तसेच जर विद्यार्थी शाळेत नाहीत, तर शिक्षकांनी ५० टक्के उपस्थिती लावण्यासाठी येऊन कोविडला आमंत्रण द्यावे का, या सर्व बाबींचा अभ्यास करून शाळा व्यवस्थापनाला गरज वाटत नसेल, तर अत्यावश्यक कार्य सोडून इतर बाबींमध्ये शिक्षकांना शाळेत न बोलवता वर्क फ्रार्म होम करण्याचा आदेश काढून संभ्रमावस्था दूर करावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडिज यांनी केली आहे.
दहावी-बारावीच्या फेरपरीक्षा सुरूच राहणार-
कालपासून राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून या परीक्षा सुरूच राहणार आहेत. त्यांच्या वेळापत्रकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही, असे राज्य शिक्षण मंडळाने सायंकाळी जाहीर केले. मुंबई ठाणे आदी परिसरात ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद राहणार असल्या, तरी फेरपरीक्षा मात्र सुरूच राहतील. यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.
हेही वाचा-यंदा बाबासाहेबांना ऑनलाइन अभिवादन, पालिका करणार महापरिनिर्वाण दिनाचे थेट प्रक्षेपण