मुंबई :राज्यातील कृषी आणि संलग्न महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेच्या नियमांत बदल करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. त्यासोबत महाविद्यालयांनाही शेवटच्या तारखेपर्यंत प्रवेश देता येणार आहे. विद्यार्थि हिताला प्राधान्य देत कृषी महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रिये संदर्भात नियमात बदल करण्यात आले आहेत.
कृषी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, प्रत्येक टप्प्यानंतर महाविद्यालयात नेमक्या किती जागा रिक्त राहिल्या आहेत. त्याची माहिती मिळणार आहे. त्या नुसार त्यांना शिक्षणाचे पर्याय निवडता येणार आहेत. यात राखीव जागांचा लाभ विद्यार्थ्याला होईल. कृषी प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीभूत पद्धतीने राबवण्या बाबतही बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्यासोबत कृषी शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे कॉलेज, संस्था यांना खासगी कृषी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी परवानगी देण्याबाबात बैठकीत चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीत कृषी विद्यापीठे, कृषी महाविद्यालये, रोपवाटीका बाबतच्या प्रश्नांवर चर्चा झाली.